Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

सरकार शाळा बंद करणे तुमचे काम नाही! कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणे म्हणजे गोरगरिबांना शिक्षण नाकारणेच होय.

 वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय बंद करण्याची तयारी शासनाने चालवली आहे.  या विरोधात जनमत तापू लागले तेंव्हा राज्यातील एकही शाळा बंद होणार नसल्याची सारवासारव सरकार मधील शिक्षण खात्याचे मंत्री करू लागले आहेत! मग वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची माहिती आणि या शाळा बंद करण्याची काय तयारी करण्यात आली आहे? अशी माहिती कशासाठी मागविण्यात आली? सरकार सामान्य माणसाला वेड्यात काढता काय! वाडी वस्त्यावर शिक्षणाची गंगा पोहंचवण्यासाठी बापजाद्यांनी कष्ट उपसले.  सरकारी, अनुदानित शाळा वाढवून त्यांना दर्जेदार बनविण्या ऐवजी या शाळांच बंद करण्याचा तुमचा डाव वाड्या वस्त्यावरील गोरगरिब श्रमिक-कष्टकरी वर्गाला शिक्षणाची दारे बंद करण्याचा आणि शिक्षणाला धंदा बनवून हे क्षेत्र तुमच्या अंबानी आणि अदानी या मित्रांना देणे हाच आहे! महाराष्ट्राच्या महान शैक्षणिक वारशाने शरमेने खाली मान घालावी अशीच ही बाब आहे.
देशात महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. शिव, फुले, शाहू,  आंबेडकर अशी महान परंपरा या राज्याला आहे.  राजेशाही केवळ राजा, राण्या, राजपुत्र आणि त्यांचे सोयरे धायरे यांच्या ऐशोरामासाठीच असते, असा पक्का समज असलेल्या काळात महाराष्ट्राच्या याच मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन केले . स्वतः च्या लेकरा प्रमाणे जनतेची काळजी घेतली. अनिष्ठ रूढी व परंपरांना मुठमाती दिली. रयतेच्या भाजीच्या देठाचीही काळजी या राजाने घेतली. त्यांचा तो वारसा छत्रपती संभाजी महाराजांनी चालवला परंतु हजारो वर्षे जहागि-या आणि वतनांवर वेटोळे घालून बसलेल्या नागोबांनी शिवबांचे रयतेचे राज्य धुळीस मिळवले. आणि पुन्हा या राज्यातील गोरगरिब श्रमिक-कष्टकरी वर्गाला अज्ञान अंधश्रद्धेच्या अंधारगुहेत ढकलून देण्यात आले. महाराष्ट्रातील जनतेला शिवछत्रपतींचाही विसर पडावा अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली तेंव्हा….
…एका महात्म्याचा जन्म झाला. महात्मा जोतिराव फुले यांचा. त्यांनी रायगडावर काट्या कुट्यात हरवून गेलेली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. रयतेच्या राजाची महाराष्ट्राला पुनश्च ओळख करून दिली.  गोरगरीब ,श्रमिक-कष्टकरी वर्ग अर्थात बहुजन समाजाच्या दु:स्थितीचे मूळ कुठे आहे.  हा बहुजन वर्ग जनावरांसारखे जीवन का जगतो आहे याचा विचार करत असताना, या समाजात असलेले ‘अज्ञान’ हेच या लोकांच्या या स्थितीचे मूळ  असल्याचे या महात्म्याच्या  लक्षात आले. “विद्ये विना मती, निती,गती, वित्त गेल्याने शूद्र अर्थात बहुजन खचल्याच्या निष्कर्षापर्यंत ते पोहंचले!”  आणि मग बहुजन समाजाला यातून बाहेर काढायचे असेल तर शिक्षणा शिवाय पर्याय नाही हे त्यांच्या लक्षात आले  आणि  महात्मा जोतिराव फुले यांनी शिक्षण प्रसाराची मुहूर्त मेढ रोवली. पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केली, पुढे दलितांसाठी त्यांनी शाळा सुरू केल्या तेंव्हा प्रस्थापित ब्राह्मण्यवादी व्यवस्थेने त्यांचे कसे स्वागत केले हे आपणास माहित आहेच….अगदी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला देखील करण्यात आला.
महात्मा जोतिराव फुले यांचा शिक्षण प्रसाराचा वारसा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी पुढे चालवला. आपल्या छोट्याशा संस्थानात  ‘मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा’ शाहू महाराजांनी केला. महाराज केवळ कायदा करूनच थांबले नाहीत  तर अगदी शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहंचवण्या साठी शक्य तेवढे सर्व प्रयत्न त्यांनी केले. गरीबी परिस्थितीमुळे बहुजन समाज मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यास असमर्थ होता तेंव्हा या मुलांसाठी वसतिगृहांची सोय राजर्षींनी केली. आणि मग कुणी मुलांना शाळेत पाठवत नसेल तर त्यांना दंड ठोठावण्यास त्यांनी मागे पुढे पाहिले नाही.  महात्मा जोतिराव फुले आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सामान्य माणसाला,  ज्यांना शिक्षणा पासून मुद्दामहून, जाणिवपूर्वक दूर ठेवले त्यांना शिक्षण देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले.
महात्मा जोतिराव फुले आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा ‘शिक्षण प्रसाराचा’ हा वारसा पुढे चालवत असताना  घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले “शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि तो पिलेला माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही!” पुढे आणखी ते असेही म्हणाले की “शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा!” त्यांनी दलित, शोषित आणि वंचित घटकांसाठी शाळा,  महाविद्यालये आणि वसतिगृहे सुरू केली. त्यामुळे शिक्षणाचा प्रसार झाला.
महात्मा जोतिराव फुले,  राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्या पासून प्रेरणा घेत कर्मवीर भाऊराव पाटील,  डॉ. पंजाबराव देशमुख, डॉ. बापूजी साळुंखे, कर्मवीर मामासाहेब जगदाळे, समाजसुधारक बलभीमराव कदम,….अशा शिक्षण महर्षीची एक पिढीच उदयाला आली. त्यांनी गोरगरीब, श्रमिक-कष्टकरी,  दलित शोषित वर्गाला  अगदी वाडी, वस्ती, तांड्यावर शिक्षण पोहंचवले. स्वातंत्र्य मिळे  पर्यंत शिक्षण ‘दाना’वर चालत होते. परंतु नंतर शासनाने त्यात हातभार उचलायला सुरवात केली. शिक्षण महर्षींनी सुरू केलेल्या शाळा महाविद्यालयांना ‘अनुदान’ देण्यास आणि जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका यांचे मार्फत शाळा शाळा उघडून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहंचवण्या साठी प्रयत्न सुरू केले. परिणामी राज्यात शिक्षणाचा प्रसार झाला.  आणि एक पुरोगामी आणि प्रगतीशील राज्य म्हणून महाराष्ट्र देशात पुढे आले…
परंतु आता इतिहासाची चाके उलटी फिरवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. गोरगरीब, श्रमिक-कष्टकरी वर्गाला शिक्षणाची दारे बंद करण्याचा कुटील डाव खेळला जातो आहे. नवीन शैक्षणिक धोरणात त्याचे सूतोवाच केले आहे.  वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय हा, याच धोरणाचा परिपाक आहे.  राज्यात अशा शाळांची संख्या सुमारे पंधरा हजार आहे. प्रत्येक शाळेत सरासरी  पंधरा मुले आहेत असे गृहीत धरले तरी सव्वा दोन लाख मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार आहे.  कुठे आहेत या शाळा? वाडी, वस्ती, तांडा याठिकाणी! यातील बराचसा भाग दुर्गम!  स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना यातील अनेक ठिकाणी रस्ता देखील पोहंचलेला नाही! पटसंख्येच्या अभावी या शाळा बंद झाल्या तर जवळच्या शाळेत जाण्यासाठी कुठे नदी आडवी तर कुठे जंगल, तिथून जाताना हिंस्त्र श्वापदांची भीती!  बंद होणा-या शाळा पहिली ते चौथी वर्गाच्या,  या वर्गात  ज्या वयोगटातील मुले आहेत, ते जवळपासच्या शाळेत जावूच शकणार नाहीत.  म्हणजे वाडी,वस्ती,  तांडा आणि दुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणाच्या मुळावर उठणारा हा निर्णय आहे.
तसेच हा निर्णय “बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा” चा भंग करणारा देखील आहे. केंद्र सरकारने बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला आहे. सह ते चौदा वयोगटातील मुलांच्या शिक्षणाची हमी हा कायदा घेतो. प्रत्येक बालकाचा एक किलोमीटर च्या परिसरात शिक्षण उपलब्ध करून देण्याची हमी या कायद्याने दिली आहे.  वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करताना आपण या कायद्याचा भंग करतो आहोत,  याचे भानही शासनकर्त्यांना राहिलेले नाही!
म्हणून सर्व लोकांनी या शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या शाळा सुरू व्हाव्यात म्हणून आपल्या महान शैक्षणिक वारशाने केलेले प्रयत्न तद्वतच आपल्या गावातील,  वस्ती,  वाडी, तांड्यावरील आपल्या पूर्वसुरींनी केलेले प्रयत्न आपल्याला विसरता येणार नाहीत. याठिकाणी शाळा सुरू झाल्यावर त्यांना केवढा आनंद झाला होता. आपल्या वस्ती, वाडी,  तांड्यावरील मुली, मुले शंभर टक्के शिकणार या भावनेने ते हरखून गेले असणार.  आणि  झालेही तसेच अगदी दुर्गम भागा पर्यंत शिक्षण त्यामुळेच तर पोहंचले. या शाळा आणि  शिक्षण वाचवणे  आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात शासन यशस्वी झाले तर उद्या पन्नास,  नंतर शंभर, पाचशे,हजार आणि शेवटी तीन हजार पटसंख्येच्या आतील शाळा बंद केल्या जाणार आहेत. तीन हजार पेक्षा जास्त विद्यार्थी संख्येचे शैक्षणिक मॉल उभे केले जाणार आहेत  आणि त्याचे चालक अंबानी, अदानी असणार आहेत याठिकाणी शिक्षण ही एक बाजारू वस्तू असणार आहे.  ज्याच्या खिशात ‘दाम’ त्यालाच त्याठिकाणी प्रवेश मिळेल, शिक्षण घेता येईल. याचाच अर्थ  ‘नाही रे’ अर्थात फुले,शाहू, आंबेडकर यांनी शिक्षण प्रवाहात आणलेला वर्ग शिक्षण प्रक्रियेतून  पुर्णतः बाहेर फेकला जाईल.
सामान्य माणसाच्या शिक्षणावर भविष्यात येऊ घातलेले संकट परतवून लावण्यासाठी वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला  भाग पाडले पाहिजे. जनतेने सरकारला ठणकावून सांगितले पाहिजे की ” सरकार शाळा बंद करणे तुमचे काम नाही.  नवीन शाळा सुरू करणे तुमची जबाबदारी आहे, तुम्ही देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न दाखवतात.  महासत्ता एकेका विद्यार्थ्यासाठी रेल्वे चालवते.  प्रत्येक गावात अगदी सर्व सोयींनीयुक्त शाळा आहेत. विद्यार्थी संख्येची अट नाही! शिक्षकांना शिकवण्या शिवाय दुसरे काम नाही!….या बाबींचे अनुकरण करा.”
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय म्हणजे गोरगरिबांना शिक्षण नाकारणेच त्यामुळे शिक्षण वाचविण्यासाठी  हा निर्णय रद्द करण्यास भाग पाडले पाहिजे.
-( राजकुमार कदम, सरचिटणीस मराठवाडा शिक्षक संघ,
निमंत्रक, शिक्षण बचाव नागरी समिती जिल्हा बीड )
मो. न. 9404259913
[email protected]

About kalakridadoot

Check Also

संकटग्रस्त महिलांचा आधार म्हणजे सखी सेंटर…. वनिता पिंपळे.

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInजालना/प्रतिनिधी – संकटग्रस्त महिलांना तत्काळ आधार , निवारा, उपचार आणि समुपदेशन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!