वैष्णवी सोनटक्केची खो-खोत तर मोनिका पवारची कबड्डीत निवड
जालना- येथील जिल्हा परिषदेच्या क्रीडा प्रबोधिनीच्या दोन खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवरील खो-खो व कबड्डी संघात निवड झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर खो-खो स्पर्धेत निवड होणारी वैष्णवी बळीराम सोनटक्के ही जालना जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली आहे.
जालना शहरातील जिल्हा परिषदेच्या क्रीडा प्रबोधिनीच्या मैदानावर गत सप्ताहात 14 वर्षाखालील गटातील राज्यस्तरीय खो- खो स्पर्धा पार पडली होती. याच स्पर्धेदरम्यान खो-खोचा राज्यस्तरीय संघ निवडण्यात आला. या राज्यस्तरीय संघात जालना जिल्हा परिषदेच्या क्रीडा प्रबोधिनीची खेळाडू वैष्णवी बळीराम सोनटक्के हिची निवड झाली आहे. राष्ट्रीय पातळीवरील खो-खो स्पर्धेसाठी निवड होणारी वैष्णवी सोनटक्के ही जालना जिल्ह्यातील पहिलीच खेळाडू ठरली आहे. राष्ट्रीय पातळीवरील खो-खो स्पर्धा झारखंड राज्यातील रांची येथे होणार आहे.
जालना जिल्हा परिषदेच्या क्रीडा प्रबोधिनीची कबड्डीपटू मोनिका निवास पवार हिची 17 वर्षाखालील मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी संघात निवड झाली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी येथे दि २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या राज्यस्तरीय १७ वर्षा खालील शालेय मुले व मुली गटातुन तिची निवड झालेली असुन राजस्थान मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
महाराष्ट्राच्या खो-खो व कबड्डी संघात निवड झालेल्या वैष्णवी सोनटक्के व मोनिका पवार यांना जिल्हा परिषदेच्या क्रीडा प्रबोधिनीचे प्रमुख प्रमोद खरात यांच्या नेतृत्वाखाली रविंद्र ढगे, संतोष मोरे,अमोल चव्हाण व प्रियंका येळे हे मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करीत आहेत.