Breaking News
किया अप भी अपने न्यूज़ पेपर की वेब साईट बनाना चाहते है या फिर न्यूज़ पोर्टल बनाना चहाते है तो कॉल करें 9860450452 / 9028982166 /9595154683

हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्याचे तहसीलदार सुहास हजारे यांचे आवाहन

बीड, दि. 11 (जि. मा. का.) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून देशासाठी बलिदान देणाऱ्या स्त्री-पुरुषांचे स्मरण करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यात पुरूषांच्या बरोबरीने महिलांचे योगदान प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. सविता शेटे यांनी आज येथे केले.

जिल्हा माहिती कार्यालय, तहसील कार्यालय आणि महिला कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महिलांचे योगदान या विषयावर डॉ. शेटे यांनी विचार व्यक्त केले. तहसील कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी तहसीलदार सुहास हजारे, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती संप्रदा बीडकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी तहसीलदार सुहास हजारे यांनी हर घर तिरंगा उपक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना यावर्षी दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात कार्यवाही करण्यात येत आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, रास्त भाव दुकान, पोस्ट ऑफिस व विविध सार्वजनिक ठिकाणी विक्रीसाठी ध्वज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या अभियानात बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सक्रिय योगदान देऊन हा उपक्रम यशस्वी करावा. तसेच, राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्या म्हणाल्या.
प्राचार्या डॉ. सविता शेटे म्हणाल्या, स्वातंत्र्यासाठी देशात विविध प्रांतातील जनतेने प्राणांचे बलिदान दिले आहे. भाषा, जाती, धर्म, स्त्री, पुरुष, धर्म, वंश, प्रांत अशी बहुविविधता विसरून जाऊन सगळ्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आंदोलने उभारली व क्रांतीचा लढा दिला. यामध्ये महिलांचे योगदान देखील महत्त्वाचे आहे.
डॉ. शेटे म्हणाल्या, ब्रिटिश राजवटी विरोधातील दीडशेपेक्षा जास्त वर्षाच्या कालखंडातील स्वातंत्र्यलढ्यात राजे संस्थानिक पासून सर्वसामान्य नागरिक देखील सहभागी होते. त्याशिवाय हा लढा पूर्ण होऊ शकला नसता. स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींच्या सत्याग्रह व अहिंसेच्या मार्गाने जाऊन भारतासह जगातील अनेक देशात स्वातंत्र्यासाठी आंदोलने झाली. दक्षिण आफ्रिकेतील नेल्सल मंडेला यांचे आंदोलन त्यापैकी एक आहे. स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही, स्वातंत्र्यामध्ये वाढणारी आजची पिढी भाग्यशाली आहे, असा उल्लेख त्यांनी केला.
स्वातंत्र्यलढ्यातील सहभागी महिलांची माहिती देताना त्यांनी 1857 च्या उठावात झाशीची राणी लक्ष्मीबाईचे नाव अग्रभागी आहे, असे स्पष्ट केले. झाशीच्या राणीला या लढ्यात साथ देणाऱ्या फुलकारीबाई, मोतीबाई, काशीबाई, सुंदरबाई यांच्याशिवाय राणी लक्ष्मीबाईचा लढा पूर्ण झाला नसता. नंतर देखील स्वातंत्र्य युद्धात झीनथ महल, बेगम हसरत महल, राणी चिन्नमा या राजघराण्यातील राण्यांचे योगदान राहिले. यामध्ये अहिल्याबाई होळकरांचे नाव देखील महत्त्वाचे आहे, असे सांगून स्वातंत्र्य लढ्याच्या विविध टप्प्यांवर आपल्या सहभागाने सतत क्रांतीज्योत सतत धगधगत ठेवणाऱ्या महिला क्रांतीकारकांची माहिती त्यांनी दिली.
प्राचार्या डॉ. शेटे म्हणाल्या, महात्मा गांधींच्या चळवळीला बळकटी देण्याचे काम देखील महिलांनी पुढे येऊन केले. सरोजिनी नायडू, कस्तुरबा गांधी, भिकाजी रुस्तुम कामा यांच्या पाठोपाठ अनेक भारतीय युवती व महिलांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. वेळोवेळी व कठीण प्रसंगात देखील मोठ्या धैर्याने तिरंगा ध्वज उंचावून या युवतींनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणास्त्रोत निर्माण केले. अरुणा असफ अली, कृष्णकुमारी सरदेसाई, अवंतिका गोखले, कादंबरी गांगुली, राजकुमारी अमृत कौर, सत्यभामा कुवळेकर, स्वरूपा राणी अशी एक ना अनेक नावे आहेत, ज्याने हा दैदिप्यमान इतिहास निर्माण झाला. उषा मेहता, इंदिरा गांधी यांनीही बालपणी स्वातंत्र्यलढ्यात खारीचा वाटा उचलून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. कल्पना दत्त, कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वतः या चळवळीत भाग घेतला, असे त्या म्हणाल्या.
जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती संप्रदा बीडकर यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची संकल्पना सांगितली. हर घर तिरंगा उपक्रमाच्या प्रसिद्धीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने विविध माध्यमांतून उपक्रम राबविले जात असून आजच्या या कार्यक्रमात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना विविध विभागांचे योगदान महत्त्वाचे ठरत आहेत, असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमास नायब तहसीलदार (निवडणूक) विनायक धावने, नायब तहसीलदार (महसूल) लता शिरसाट, नायब तहसीलदार श्री. जाधवर, श्री. शिवाजी पाटील, महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्यासह शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, महिला कला महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दोन्ही शासकीय कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे अध्यापक यांचा सहभाग होता.
उपस्थित मान्यवरांचे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. संध्या आयस्कर यांनी केले. आभार किरण वाघ यांनी मानले. कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व सांगता राष्ट्रगीताने झाली.
प्राधान्य कुटुंब लाभार्धी योजनेच्या पात्र लाभार्थी
महिलांना शिधापत्रिकांचे वितरण
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित आजच्या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी यादिवसाचेचित्य साधून पूरवठा विभागाच्या वतीने लाभार्थ्याना शिधापत्रिका वाटप करण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्राधान्य कुटुंब लाभार्धी योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी तहसीलदार सुहास हजारे, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती संप्रदा बीडकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
00000

About kalakridadoot

Check Also

शालेय जीवनापासून वाचनाची आवड ठेवा – पोलिस अधीक्षक तुषार दोशी

Facebook Twitter WhatsApp Telegram LinkedInकर्जत येथील राजुरेश्वर मध्ये ‘मी कसा घडलो’ कार्यक्रमात प्रतिपादन… अंबड/ प्रतिनिधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
error: Content is protected !!