जालना,दि.२७ (प्रतिनिधी) येथील संस्कार प्रबोधिनी विद्यालयात मराठी राजभाषा दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. कैलास इंगळे, डॉ. प्रा. सुहास सदाव्रते, संस्थेचे सुरेश कुलकर्णी यांनी दिंडी उदघाटन करुन वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रारंभी विद्यार्थ्यांनी भाग्यनगर परिसरात ग्रंथ दिंडी काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे या दिंडीवर परिसरातील नागरीकांनी पुष्पवृष्टी करुन ग्रंथदिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यानंतर शाळेत कुसुमाग्रज सभागृहाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
कुसुमाग्रज सभागृहात विद्यार्थ्यांनी कवी, साहित्यांची चित्रे रेखाटली होती. तर ग्रंथदिंडीत वेगवेगळ्या वेषभूषा तयार करुन विद्यार्थी सहभागी झाले होते. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी काव्य वाचन केले. यात आदित्य सरडे याची शब्द कविता, गायित्री डोईफोडे हीची बाप कवितेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर डॉ. कैलास इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले असले तरी आज प्रतिपंढरपूरला गेल्याचा आनंद या दिंडीतून मिळाला. विद्यार्थ्यांनी सृजनशिलतेची निर्मिती सतत करत राहावी, असे ते म्हणाले. बालवयातच संस्कार रुजवले जातात. आणि ते काम संस्कार प्रबोधिनीतील विद्यालय करत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. त्यानंतर डॉ. प्रा. सुहास सदाव्रते यांनी विद्यार्थ्यांना मराठी राज भाषा कशा पध्दतीने वाढवावी, या संदर्भात मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, आजपर्यंत अनेक सामाजिक स्थित्यंतरे झाली. तरी मराठी राज भाषा टिकून असल्याचेही त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप करतांना प्रा. सुरेश कुलकर्णी केसापूरकर म्हणाले, भाषेचे अनन्य साधारण महत्व आहे. मातृभाषेतूनच शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांना भविष्यात अडचणी येत नाहीत. कोणतेही ज्ञान भाषेतच आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभागाचे प्रमुख रामदास कुलकर्णी यांनी केले होते. या कार्यक्रमास मु. अ. ईश्वर वाघ, किरण धुळे, श्रीमती रेखा हिवाळे, श्रीमती किर्ती कागबट्टे, शिक्षकेत्तर कर्मचारी पवन साळवे, नितेश काळे, विद्यार्थी, पालक आदींची उपस्थिती होती.